#१ - अवलिया प्रवासी !
लहानपणापासून व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या
गोष्टीचा छंद असतो,
आवड असते, विशिष्ट क्षेत्रात प्रचंड रुची असते आणि तीच गोष्ट त्या
व्यक्तीचे आयुष्य सुखकरपणे जगण्यास कारणीभूत ठरते.
एसटीच्या या अनोख्या सफरीत मी अवलियाप्रवासी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे, तर चला प्रवास सुरु करूया.........
छंदाच्या या नानाविध प्रकारात अनेक गोष्टी दडल्या आहेत, त्यातील जवळपास सर्वांची आवडती गोष्ट म्हणजे फिरणे. फिरायची
आवड कुणाल नसते हो. प्रत्येकाला फिरण्याची, भटकण्याची आवड असते, किंबहुना या भटक्या
प्रवृत्तीतून अनेक भटके प्रसिद्ध देखील झाले आहेत आणि त्याच्या विशिष्ट शैलीतून ते
आपल्याला अनेक नव्या - जुन्या ठिकाणांची सफर देखील घडवत आहेत.
अशीच फिरायची,
बागडायची, नव-नवीन ठिकाणे धुंडाळून काढायची आवड मला देखील लहानपणापासूनच, पण मी केलेल्या या सर्व भ्रमंतीमध्ये माझे प्रवासाचे माध्यम मात्र हटके होते आणि ते अनोखे माध्यम म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी अर्थातच आपली लाडकी एसटी
!
होय ! मी
एसटीबद्दलच बोलतोय.
तीच एसटी जी महाराष्ट्राच्या प्रवासी वाहतुकीचा कणा म्हणून
ओळखली जाते.
तीच एसटी जी महाराष्ट्राची नाळ म्हणून
ओळखली जाते
आणि तीच एसटी जी ‘लालपरी’ म्हणून देखील ओळखली जाते आणि त्या
लालपरीचा असणारा मी निस्सीम चाहता, निस्स्मी भक्तच !
आपल्या
प्रियसीवर आपण ज्याप्रकारे निस्सीम प्रेम करतो, अगदी तसेच प्रेम माझ्या या
एसटीवर आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
एसटीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका अवलिया प्रवासीच्या जीवनात
एसटीचे महत्त्व नेमके काय आहे ? का त्याला इतकी एसटी आवडते ? एसटीचे महत्त्व पटवून
देण्यासाठी हा अवलिया प्रवासी नेमकं काय काय करत आहे ? एसटीने केली जाणारी भटकंती ही नेमकी कश्याप्रकारची असते ? ती कशी केली जाते ? रोहित धेंडेपासून ‘अवलिया प्रवासी’पर्यंतचा हा
प्रवास नेमका कसा आणि कधी सुरु झाला ? याची संपूर्ण माहिती म्हणजे हा ब्लॉग आहे, असे
मला वाटते.
सामाजिक माध्यम अर्थातच सोशल मिडियाच्या अनेक माध्यमांवर (फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब) मी
सक्रीय असून, एसटीबाबत अनेक प्रबोधनात्मक गोष्टी देखील मी माझा या आवडीतून करत आहे.
वृक्ष-प्रेमी, प्राणी-प्रेमी पक्षी-प्रेमी इ.च्या गदारोळात ‘एसटीप्रेमी’ ही
संकल्पना कधी रूढ झाली हे माझे मलाच समजले नाही आणि आज माझासारखे अनेक लोकं या
प्रवाहात आहेत हे सांगायला मला पुष्कळ आनंद होतो.
कोणत्याही शहराची, राज्याची, देशाची सार्वजनिक प्रवासी
वाहतूक व्यवस्था हा त्या देशाच्या प्रगतीचा आरसा असतो असे म्हटले जात असताना, महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीचे हे स्वरूप नेमके कसे आहे ? या सेवेतील सकारात्मक
गोष्टीसोबत, भरून काढावयाच्या उणिवा इ. गोष्टी आपल्याला माझा या ब्लॉगमध्ये नक्कीच
पाहायला मिळतील आणि मला अशा आहे, की हा अनोखा प्रवास तुम्हाला नक्की आवडेल.
अवलियाप्रवासी नावाच्या या चालकासोबत माझा या लालपरीतून, प्रवासी
म्हणून आपण सुरु करत असलेला हा प्रवास, माझा अनुभवातून तसेच लेखणीतून कधी संपूच
नये, असा अनुभव मी आपल्याला या माध्यातून देऊ इच्छितो आणि मला अशा आहे, की या बसचे विनामुल्य
तिकीट आपण निःसंकोचपणे फाडाल आणि या प्रवासाचा मनमुराद आनंद घ्याल !
![]() |
| छायाचित्र साभार : निरज सबनीस, कराड |

Comments
Post a Comment