#२ - लहानपणीची एसटी


टीन टीन......


माझा पहिल्या ब्लॉगमध्ये मी आपल्याला माझ्या विषयी अर्थातच रोहित दादासाहेब धेंडे विषयी अगदीच थोडक्यात माहिती दिली. या ब्लॉगमध्ये मी माझ्या एसटीप्रेमाचा हा प्रवास नेमका कसा सुरु झाला, त्याविषयी लिहिणार आहे.
         
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे माझे पाय नेमके कश्याप्रकारे दिसले होते हे मी माझा घरच्यांना कधीच विचारले नाही, पण एसटीची ही आवडत जेव्हापासून वृद्धिंगत झाली, तेव्हापासून मात्र घरच्यासोबत बोलणे अगदीच मोकळेपणाचे झाले, अर्थातच माझा या छंदाला, प्रेमाला बहरण्याचे काम देखील त्यांनीच केले हे विशेष !

इतर पोरांप्रमाणे मला देखील लहानपणापासून गाड्यांची हौस प्रचंड ! त्यातल्या त्यात ट्रक , बस अश्या मोठ्या गाड्यांवर विशेष प्रेम !
बाहेर फिरायला वगैरे जाताना रस्त्यावरून जाताना कोणती मोठी गाडी दिसली, की पुष्कळ आनंद व्हायचा, त्यामुळे फिरणे हा विषय लहानपणापासून आवडीचा बनला. फिरायला गेलो, की गाड्या दिसतात हे समीकरण अगदीच घट्ट मनात रुजले होते.

रिक्षा किंवा बसमधून प्रवास होताना सिग्नलवर उभ्या असणाऱ्या वाहतूक हवालदाराकडे पाहून आपण देखील भविष्यात असेच हवालदार व्हावे, जेणेकरून आपल्याला रोज गाड्या पाहायला मिळतील असे वाटायचे.
नंतर नंतर थोडंफार कळायला लागल्याने गावी किंवा दूरवरच्या प्रवासाला जाताना बसने प्रवास व्हायचा. एसटी किंवा खाजगी बस (ट्रॅव्हल्स) मिळेल त्या साधनाने आमच्या कुटुंबाचा प्रवास होत असताना, रस्त्यावरून जाणाऱ्या छोट्या गाडीपेक्षा बस हे मोठे वाहन अधिक भावायला लागले.

दरवेळी गावी किंवा दूरवरच्या ठिकाणी जायचा प्लॅन झाला, की सर्वात प्रथम मी खुश व्हायचो. गावी जायला मिळणार या आनंदापेक्षा बसने जायला मिळणार याचाच आनंद मला खुप व्हायचा आणि तो आनंदच माझा उत्साह वाढवायचा.
उन्हाळी सुट्टी असो किंवा दिवाळी सुट्टी, दरवर्षी गावी जाणे होत असल्याने, बसचा प्रवास हा हमखास व्हायचा.
रात्रभर जागून हा प्रवास नेमका कसा होतो हे पाहण्याची जी सवय लहानपणापासून लागली, ती सवय आज देखील तितकीच कायम आहे.
प्रवास सुरु झाल्यावर तो कधी संपूच नये आणि त्या प्रवासाचा शेवट कधी होऊ नये, अश्या भावना आज देखील मला प्रत्येक प्रवासात दाटून येतात.

प्रत्येक हंगामात खाजगी बसच्या दरात चढ - उतार होत असल्याने, सुट्टीच्या दिवसात हे दर चढ्यानेच असयाचे, त्यामुळे आम्ही कित्येकदा एसटीने बसनेच जायचो.
एसटी बसचे तिकीट मिळाले नाही, तरच घरचे खाजगी बसचा अवलंब करायचे, त्यामुळे खाजगी बस तसेच एसटी बस या दोन्ही बसेसचा अनुभव मला मिळत होता.

पण या दोन्ही प्रवासात मला गेली अनेक वर्ष भावली ती फक्त एसटीच !

एसटीने जेव्हा जेव्हा प्रवास करायचो तेव्हा तेव्हा बस स्थानकातच जावे लागत असे.
बस स्थानकात गेले की बसेसची रेलचेल, घोषणा, विक्रेते इ. गोष्टींची चहल पहल चालूच असायची आणि ते पाहायला मला फार मजा यायची.

आपल्याला गावी घेऊन जायला, आज नेमकी कोणती बस येणार आहे याचे कुतूहल मला फार असायचे आणि शिवाय मागे आपण कोणत्या बसने गेलो याचा नंबर देखील मी लक्षात ठेवत असल्याने नेमकी त्याच नंबरची जर बस आली, की माझा आनंद गगनात मावेनासा व्हायचा.
आपण लक्षात ठेवलेली बस आली, की छाती फुगवून मी माझा पप्पांना सांगायचो, ‘पप्पा, मागच्या वेळी सुद्धा आपण याच बसने गेलो होतो’

बस आलेली पाहून, समान घेऊन सर्वांना बसमध्ये चढवण्याच्या घाई गडबडीतपप्पा पुरतेच माझाकडे दुर्लक्ष करायचे.
आरक्षित सीटवर बसून, एकदा का गाडी सुरु झाली की माझा चेहऱ्यावर गोड हास्य नेहमी तरळायचे, की जे आज देखील नकळत येतेच.

‘आरक्षणवाले सर्व आले का’ असे मास्तर बोलून, डबल बेल देताच चालकांनी गाडी बस स्थानकातून बाहेर काढताच खिडकीतून येणारा वारा, मला फार सुखावून जायचा.
मला बाहेर बघायला लागत असल्याने वडील देखील मला खिडकी जवळच बसवत.
‘हात बाहेर काढू नकोस’, अशी फक्त सुरुवातीलाच आणि ती ही एकदाच तंबी दिली की मी प्रवास संपेपर्यंत हात बाहेर काढत नसे.
पप्पांचा धाक म्हणा किंवा स्वतःची काळजी म्हणा.

प्रवाश्यांचे तिकीट फाडणे, आरक्षितांचे आरक्षण चेक करणे, अशी मास्तरची काम मी फार टक लाऊन पहायचो आणि एकदा का एका मास्तरची सर्व काम झाली, की पुन्हा डबल देऊन मास्तर चालकाला लाईट बंद करण्याचा इशारा देत.
चालत्या गाडीत, हात वर करून, बोट चाचपडत गाडीच्या लाईट बंद झाल्या की माझी नजर भिडायची ती थेट चालकावर !

चालक गाडी कशी चालवतो, स्टेरिंग कसे फिरवतो, गाडी झोकात कशी चालवते ,चालक ओव्हरटेक कसा करतो हे सर्व सर्व पाहायला मला खूप भारी वाटायचे.
वाटेत येणारे बस स्थानक, उतरणारे – चढणारे प्रवासी, बसमध्ये होणारा गोंगाट, मध्येच हॉटेलमध्ये जेवायला थांबलेली बस, हे सर्व अनुभव मला तेव्हापासून आकर्षित करत होत, गोडी निर्माण करत होते.

लहानपणापासून केलेल्या एसटीच्या या प्रवासाची गोडी ही कशी वृद्धिंगत झाली हे माझं मला देखील समजले नाही.
वरती मी म्हटल्याप्रमाणे खाजगी बस (ट्रॅव्हल्स) ने देखील आमचा प्रवास व्हायचा, पण तो प्रवास कधीच एसटीसारखा व्हायचा नाही. मी अनेक वेळा वेगवेगळ्या एंगलने या प्रवासाची तुलना करण्याचा खुप प्रयत्न केला, अनेकदा प्रवास चांगला झाला देखील, पण एसटीच्या त्या स्वादाची कमतरता मला सतत खाजगी बसमध्ये जाणवत असे.

गावी जाताना पप्पा जेव्हा तिकीट आरक्षित करायचे, तेव्हा घरी आल्यावर कोणते तिकीट काढले, हे मी विचारल्यावर ‘एसटीचे तिकीट मिळाले’ असं जेव्हा पप्पा सांगायचे, तेव्हा मात्र मी आनंदाने नाचायचो.

लहानपणी मी अनेकदा एसटीने प्रवास केलाय, पण त्या प्रवासाचे सबंध फक्त शहर ते गाव इतकेच मर्यादित होते. या प्रवासात मला आठवतं, त्याप्रमाणे मी एसटीची बस कशी असते, तिला नंबर कोणता असतो, तिचा रंग कोणता असतो, तिला मार्गफलक पाटी कशी असते इ. बाबींचे सूक्ष्म निरीक्षण मी फार फार करायचो आणि हेच सर्व निरीक्षण मला भविष्यात ‘एसटीप्रेमी’ हे नाव देतील, हे मला कधी वाटले देखील नव्हते.........

-      क्रमशः   


Comments