#२ - लहानपणीची एसटी
टीन टीन...... माझा पहिल्या ब्लॉगमध्ये मी आपल्याला माझ्या विषयी अर्थातच रोहित दादासाहेब धेंडे विषयी अगदीच थोडक्यात माहिती दिली. या ब्लॉगमध्ये मी माझ्या एसटीप्रेमाचा हा प्रवास नेमका कसा सुरु झाला, त्याविषयी लिहिणार आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे माझे पाय नेमके कश्याप्रकारे दिसले होते हे मी माझा घरच्यांना कधीच विचारले नाही, पण एसटीची ही आवडत जेव्हापासून वृद्धिंगत झाली, तेव्हापासून मात्र घरच्यासोबत बोलणे अगदीच मोकळेपणाचे झाले, अर्थातच माझा या छंदाला, प्रेमाला बहरण्याचे काम देखील त्यांनीच केले हे विशेष ! इतर पोरांप्रमाणे मला देखील लहानपणापासून गाड्यांची हौस प्रचंड ! त्यातल्या त्यात ट्रक , बस अश्या मोठ्या गाड्यांवर विशेष प्रेम ! बाहेर फिरायला वगैरे जाताना रस्त्यावरून जाताना कोणती मोठी गाडी दिसली, की पुष्कळ आनंद व्हायचा, त्यामुळे फिरणे हा विषय लहानपणापासून आवडीचा बनला. फिरायला गेलो, की गाड्या दिसतात हे समीकरण अगदीच घट्ट मनात रुजले होते. रिक्षा किंवा बसमधून प्रवास होताना सिग्नलवर उभ्या असणाऱ्या वाह...